मनपा निवडणुक मतदानासाठी सर्व आस्थापनातील, कारखान्यांतील कामगारांना भरपगारी सुट्टी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/01/2026 10:13 PM


 सांगली, दि. 13,
 निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादिमध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सहाय्यक कामगार आयुक्त मु.अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
 
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घ्यावी. 
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरूद्ध कारवाई करण्यात येईल. आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली, दुरध्वनी क्रमांक 0233-2950119 अथवा ई-मेल आयडी aclsangli@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या