मेगदे गुरुजी स्मृती व्याख्यानमालेत दिलीप ठाकूर यांना सेवा गौरव पुरस्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/02/2026 10:31 AM

नांदेड :- यमुना प्रतिष्ठान, मुदखेड यांच्या वतीने आयोजित कै. गणपतराव मेगदे गुरुजी स्मृती व्याख्यानमालेच्या तेराव्या पुष्पात ख्यातनाम वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी “चला कुटुंब जपूया” या विषयावर अत्यंत प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले.या वेळी रोख रक्कम ₹ 11,000 देऊन डॉ. जयश्री देशमुख यांना कै. शकुंतलाबाई मेगदे सेवा गौरव पुरस्कार व धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांना कै. गणपतराव मेगदे सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात कुसुम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास श्रोत्यांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. शकुंतलाबाई व कै. गणपतराव मेगदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष गोधमगावकर,सर्पतज्ञ डॉ.दिलीप पुंडे हे उपस्थित होते.

यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. उमेश मेगदे व संचालिका सौ. सुमित्रा मेगदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सचिव रमेश मेगदे यांनी प्रास्ताविकातून स्मृती व्याख्यानमालेमागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला.यावेळी देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख रुपये ११,०००, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे होते. सत्काराला उत्तर देताना धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी, “मला मिळालेला हा १०८ वा पुरस्कार केवळ माझा नसून तमाम नांदेडकरांचा आहे,” असे सांगून पुरस्काराच्या रकमेतील निधीतून कायापालट उपक्रमातील गरजूंसाठी कपडे खरेदी करण्याची घोषणा केली. डॉ. जयश्री देशमुख यांनी पुरस्काराची रक्कम वसरणी येथील निवासी अंध विद्यालयाला दिली.

अध्यक्षीय समारोप सुनील वेदपाठक यांनी केला. त्यानंतर सुरेश मेगदे यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रभावी व रंगतदार संचालन अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मधुरा शेखर मेगदे यांनी मानले.

मेगदे परिवारातर्फे सर्व श्रोत्यांसाठी रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेडिसन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड,कलांगण प्रतिष्ठान नांदेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोबाईलच्या युगातही व्याख्यानमालेसारखी वैचारिक परंपरा जपल्याबद्दल यमुना प्रतिष्ठान व मेगदे परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या