नांदेड :- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’ अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील कौशल्य विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य व उद्योजकता आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असून, एस्पायर ज्ञान व कौशल्य इंडिया प्रा.ली. या संस्थेच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र खालील अभ्यासक्रमांसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्य करणार आहे. यामध्ये
डिजिटल व विक्री-विपणन कार्यकारी, भ्रमणध्वनी हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ तसेच चित्रसजीवक (अॅनिमेशन तज्ज्ञ) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अभ्यासक्रमांचा कालावधी ३ ते १२ महिन्यांचा असून, दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही प्रशिक्षण संधी उपलब्ध आहे.
हे सर्व अभ्यासक्रम पूर्णतः मोफत असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यासोबतच स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) खुल्या प्रवर्गातील लाभार्थी पात्र असून, बेरोजगार व अल्परोजगार युवक, उद्योजक होण्याची इच्छा असलेले उमेदवार, अर्धकुशल व्यक्ती तसेच गृहिणी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी (९९७०८१६९२७) आणि अभ्यासक्रम समन्वयक डॉ. रणजीतसिंह तेहरा (८८५५०००३५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.