नांदेड :- श्री शारदा भुवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ : एक चिकित्सक विश्लेषण’ या विषयावर आयोजित व्याख्यान आज अर्थशास्त्र विभागाच्या स्मार्ट क्लासरूममध्ये उत्साहात संपन्न झाले. या व्याख्यानासाठी नांदेड येथील ज्येष्ठ सनदी लेखापाल मा. आरिफ खान हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
मा. आरिफ यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा संक्षिप्त आढावा घेत त्यांनी सदरील अर्थसंकल्पाचे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रावर व घटकावर संभाव्य काय परिणाम होतील याची चर्चा केली.
सोबतच त्यांनी सार्वजनिक खर्च- उत्पन्नाच्या स्त्रोता बाबत उपस्थितांना अवगत केले. प्रमुख वक्ते आरिफ खान यांनी भारतातील पायाभूत सुविधांचा खर्च हा उत्पादन वाढ रोजगार निर्मिती आणि जलद आर्थिक विकास वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
आपल्या सविस्तर व अभ्यासपूर्ण व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, वस्तू व सेवा कर (GST) तसेच उत्पन्न कर या मूलभूत संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. यासोबतच यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, युवक व कौशल्य विकासासाठीच्या योजना, स्टार्टअप्स व उद्योजकतेस प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. व्यापक आर्थिक सुधारणा, वित्तीय शिस्त, पायाभूत सुविधा विकासासाठी वाढविण्यात आलेली गुंतवणूक, रस्ते, रेल्वे, ऊर्जा व डिजिटल सुविधा विस्तारामुळे देशाच्या दीर्घकालीन विकासावर होणारा सकारात्मक परिणाम त्यांनी स्पष्ट केला. वस्तूंच्या किमती, महागाई नियंत्रण, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा तसेच विविध उत्पादन क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात सुधारणा, सार्वजनिक आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीची तरतूद, वैद्यकीय संशोधन, आरोग्य पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवांसाठीच्या योजनांवरही त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. सरकार महसूल कसा जमा करते व तो विविध क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कसा खर्च केला जातो, याचे अर्थसंकल्पातील तरतुदींच्या आधारे विश्लेषण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष
डॉ. जी. एन. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन स्टार्टअप , लघु व मध्यम उद्योगाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी कॉर्पोरेट मित्र सारखी योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला तसेच या अर्थसंकल्पात वैद्यकीय पर्यटन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास व इलेक्ट्रिकल उद्योगांना देण्यात येणारे प्रोत्साहन हे विकशीत भारत : 20247 च्या दृष्टीने हे एक अनुकूल पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. मा. अध्यक्षांनी अर्थसंकल्पाबाबतची जनजागृती करण्याबाबत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थी व प्राध्यापकामध्ये अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करणे, व्याख्यानाचे आयोजन करणे तसेच चर्चासत्र घडवून आणण्याबाबतचा असा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. एकूणच सदरील अर्थसंकल्पावरील व्याख्यानात प्राध्यापक व विद्यार्थ्यासोबत विविध अनुषंगाने सांगोपांग चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते, तर उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे व डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व ज्ञानवर्धक ठरले असून अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. मुठे, प्रा. डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड व डॉ. डी. डी. भोसले डॉ. प्रवीणकुमार सेलूकर आदींनी परिश्रम घेतले.