मुलगी पळवून नेल्याच्या वादातून रक्तरंजित शेवट; ५० वर्षीय व्यक्तीची हत्या...

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 14/02/2026 6:35 PM

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे किरकोळ कारणावरून एका ५० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

मृत व्यक्तीचे नाव तुकाराम सुर्यभान काळे (वय ५०, रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर) असे आहे. याबाबत त्यांच्या मुलाने राहुल तुकाराम काळे (वय २५, व्यवसाय – मजुरी) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आधी धमकी, नंतर हल्ला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे आणि तुळसाबाई एकनाथ काळे (सर्व रा. फक्राबाद) हे दिनांक १२ फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या घरी आले होते. त्यावेळी “तुम्ही कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?” असा जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच “तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकीही दिली होती. त्यानंतर वाद मिटल्याने त्यावेळी पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.
दुसऱ्याच दिवशी प्राणघातक हल्ला
मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास बबन लोंढे यांनी राहुल काळे यांना माहिती दिली की त्यांच्या वडिलांना झोपडपट्टी परिसरात मारहाण सुरू आहे. ही माहिती मिळताच राहुल व त्यांचा भाऊ दिगांबर काळे घटनास्थळी धावले.
तेथे त्यांनी पाहिले असता, आरोपी सागर काळे व वैभव काळे हे दोघे चाकूने तुकाराम काळे यांच्यावर वार करत होते, तर तुळसाबाई काळे काठीने मारहाण करत होती. आरोपींनी डोक्यावर व खांद्यावर वार केल्याने तुकाराम काळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते. फिर्यादी व नातेवाईक घटनास्थळी येत असल्याचे पाहून आरोपी वाहनावर बसून पसार झाले.
उपचारापूर्वीच मृत्यू
यानंतर जखमी तुकाराम काळे यांना तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेद्वारे जामखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
गुन्हा दाखल; एक आरोपी ताब्यात
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३५२, ३५१ अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव एकनाथ काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.
या घटनेमुळे फक्राबाद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या