🛑 कार्डलाईन सोबतच मिरज जंक्शनचा समांतर विकास व्हावा
🛑 पुणे, बेळगांव स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार करण्याचीही मागणी
------------------------------------------------------------------------
मिरज रेल्वे जंक्शनचे मॉडेल स्टेशन आणि मोदी सरकारच्या अमृत योजनेत समावेश करुन सुध्दा जंक्शनचा विकास झाला नाही. २०२६च्या केंद्रिय अर्थसंकल्पात मिरज रेल्वे जंक्शनचे पुन्हा नव्याने अमृत योजनेत समावेश केला आहे. म्हणून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची तसेच, पुणे आणि बेळगांव स्थानकांवर येऊन थांबणाऱ्या गाड्या मिरज जंक्शनपर्यंत सुरु करण्याची मागणी मिरज सुधार समिती व रेल्वे प्रवासी संघाने पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांच्याकडे केली आहे.
शनिवारी पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा मिरज रेल्वे जंक्शनच्या परिक्षण दौऱ्यावर आले असता, मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, अभिजीत दाणेकर, असिफ निपाणीकर, शब्बीर बेंगलोरे, उमेश लोंढे, सुरेश झेंडे, अमीर डांगे, श्रीकांत महाजन, संदीप हंकारे आदी कार्यकत्र्यांनी वर्मा यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किमी अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी १२८.७८ कोटींची निधीला मंजूरी दिली आहे. कार्डलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुध्दा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पध्दतीने कनेक्टीव्हिटी असणार आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून कार्डलाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार आहे.
रात्री १२ वाजताची मिरज-बेल्लारी लिंक एक्स्प्रेस सुरु करणे, दुपारच्या सत्रात मिरज-पंढरपूर मार्गावर गाडी सुरु करणे, बेळगांव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु करण्याबरोबरच अजमेर-बेंगलोर, अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस, जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेस,गांधीधाम-बेंगलोर एक्स्प्रेस गाड्यांचे सकाळच्या सत्रात मिरज जंक्शनवरील थांब्याचा कालावधी वाढविण्याची मागणी तसेच मिरज जंक्शनवरील अस्वच्छतेबाबत तक्रारी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा म्हणाले, आपण नुकतेच पुणे विभागाचा पदभार स्विकारला आहे. पुणे विभागातील मिरज जंक्शन हे महत्वाचे जंक्शन असल्याने येथील जंक्शन विकास आणि असुविधांकडे आपण जातीने लक्ष देणार असल्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले.