सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला गेला.
हनुमाननगर येथील अद्ययावत अग्निशमन केंद्राचे (FS-III) लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याच सोहळ्याचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ८ नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण त्या त्या प्रभागातील नूतन नगरसेवकांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
अग्निशमन सज्जता: हनुमाननगर केंद्र कार्यान्वित
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत २ कोटी २८ लाख ७९ हजार रुपये खर्चून हनुमाननगर येथे अत्याधुनिक 'टाईप ३' अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये अग्निशमन केंद्र इमारतीसह परेड ग्राउंड आणि सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झाले असून, यामुळे सांगली परिसरातील आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
आरोग्य क्रांती: प्रभाग स्तरावर आरोग्य मंदिरांचे लोकार्पण
नागरिकांना घराच्या जवळ मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या हेतूने १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहरात आरोग्य केंद्रांचे जाळे विणले जात आहे. आज दि. १२ फेब्रुवारी रोजी सायं. ५:४५ वाजता, महापालिका क्षेत्रातील ८ नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे (AAM) लोकार्पण त्या त्या प्रभागातील नूतन नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आरोग्य सेवेचा लाभ थेट प्रभागातील जनतेला मिळाला आहे.
लोकार्पित झालेली आरोग्य मंदिरे:
१. मिरज: रमा उद्यान (स्वामी समर्थ मंदिर परिसर), ब्राह्मणपुरी (मनपा शाळा नं. २), बेडग रोड (काच कारखाना).
२. सांगली: शिंदे मळा (गणपती मंदिर जवळ), सांगलीवाडी (मसोबा मंदिर समोर), पत्रकार नगर (कृष्णा हॉस्पिटल जवळ), भक्ती नगर (बाहुबली पार्क), महसूल कॉलनी क्र. २ (शामराव नगर).
महापालिका क्षेत्रात आता एकूण ५४ आरोग्य केंद्रांमार्फत (दवाखाने, प्रसूतीगृहे, UPHC, UHWC) सेवा पुरवली जाणार आहे. या आरोग्य मंदिरांमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांच्यासह औषधालय, प्रयोगशाळा तपासणी, लसीकरण आणि टेलीकन्सलटेशन यांसारख्या आधुनिक सुविधा मोफत उपलब्ध आहेत.
या मुख्य सोहळ्यास महापौर मा. श्री. धीरज सूर्यवंशी, उपमहापौर मा. श्री. गजानन मगदूम, मनपा आयुक्त मा. श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपायुक्त अश्विनी पाटील , मुख्य अग्निशमन अधिकारी कासाप्पा माने आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध प्रभागांतील आरोग्य मंदिर लोकार्पण प्रसंगी स्थानिक नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.