नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये आपल्या हक्कांप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी, आज २८ एप्रिल रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने 'सेवा हक्क दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सेवा हक्क दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार यांनी सेवा हक्क दिनाच्या प्रतिज्ञेचे वाचन केले.
या निमित्त महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे, याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली. तसेच प्रलंबित अर्जांचा निपटारा करून नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याचे निर्देश प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या अपिलीय सुविधेबद्दलही यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास उपआयुक्त नितिन गाढवे,उपआयुक्त अभिजित वायकोस, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, प्रकल्प अधिकारी अशोक सुर्यवंशी, कार्यालय अधिक्षक कल्याण घंटेवाड, पदमाकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने इतर कर्मचारी उपस्थित होते.