सांगली, ता. १६ –
तुकडे बंदी कायदा शहरी भागातून रद्द झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील दुय्यम निबंधकांनी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या एस.ओ.पी.नुसार काम करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक दुय्यम निबंधक नागरिकांना पैशासाठी वेठीस धरून मनाचा कारभार करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. त्यामुळे जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी सर्व कार्यालयांसमोर नागरिकांना समजेल अशा भाषेत तुकडे बंदीचे दस्त कसे केले जातात याची नियमावली फलकावर लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दस्तऐवज सकाळी स्वीकारल्यानंतर त्यांना पोहोच देणे बंधनकारक असतानाही नागरिकांना पोहोच दिली जात नाही. या बाबत जिल्हाधिकारी मा. काकडे साहेब यांची समितीशी सविस्तर चर्चा झाली असून लवकरच आवश्यक सूचना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने एस.ओ.पी. तयार करताना मा. कलेक्टर साहेब यांना समितीवर सदस्य म्हणून नेमले आहे. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी शासनाला लोकहिताचे मुद्दे सुचवले. या कार्याबद्दल त्यांचा जय हिंद सेनेतर्फे सत्कार करण्यात आला.