नांदेड :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आगामी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचे *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* यांनी बुधवारी दि.१८.०२.२०२६ रोजी स्वच्छता विभागाची महत्त्वाची आढावा बैठक घेतली आहे.
या बैठकीत प्रामुख्याने जयंती उत्सव आणि रमजान दरम्यान शहरातील मुख्य रस्ते, चौक, आणि विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरातील स्वच्छता अधिक वेगाने करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. जयंतीचा मिरवणूक मार्ग आणि मशिदींच्या परिसरातील कचरा नियमितपणे उचलण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार असल्याचे यावेळी स्वच्छता विभागाचे उपायुक्त नितीन गाढवे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये सर्व स्वच्छता निरीक्षकांनी दक्ष राहुन स्वच्छतेचे काम प्राधाण्याने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले की, शहराचे सौंदर्य राखणे आणि सण शांततेत व स्वच्छ वातावरणात पार पाडणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. यासाठी त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याचे आणि नियमित देखरेख करण्याचे आदेश दिले. या बैठकीस उपायुक्त नितीन गाढवे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, सर्व स्वच्छता निरीक्षक व शहर स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या अमृत कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.