कुपवाड, दि.२८,
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत कुपवाड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 36 येथे आज उपमहापौर गजानन मगदूम यांनी सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपमहापौरांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. महानगरपालिकेच्या शाळांचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजिटल शाळा संकल्पना, शाळांच्या इमारतींचे उन्नतीकरण तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. यामधून सक्षम व समृद्ध पिढी घडविण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
शाळांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाकडून विविध समस्यांची माहिती घेण्यात आली. शाळेचा पट वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात येतील तसेच आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमहापौरांनी दिली.
तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मनपा शाळा या खाजगी शाळांप्रमाणे गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.