जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/03/2026 5:20 PM

नांदेड :- कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, लातूरचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नाना सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ‘मैत्री’ व नॅशनल डेअरी स्कीम अंतर्गत कार्यरत सेवादाते उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील पशुप्रजनन कार्य, दुग्ध उत्पादन वाढ तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच किसान क्रेडिट कार्ड योजना, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील प्रजननक्षम गाय व म्हैस वर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिरे आयोजित करून कृत्रिम रेतनाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. अधिक दुध उत्पादन देणारी जनावरे तसेच मादी कालवडींची निर्मिती करण्यासाठी लिंगवर्गीकृत रेतमात्राचा वापर वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. दुग्ध उत्पादनवाढीसाठी विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

पशुधनातील विविध लसीकरण मोहिमांचा आढावा घेण्यात आला. लाळ-खुरकूत (FMD) लसीकरणाच्या आठव्या फेरीस सुरुवात करण्यात आली असून विहित मुदतीत लसीकरण पूर्ण करून ‘भारत पशुधन’ प्रणालीवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले. लिंगवर्गीकृत रेतमात्रासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे कार्य दुप्पट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत लिंगवर्गीकृत रेतमात्राचा पुरवठा करण्यात आला. यासंदर्भात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. स्वप्नील देशमुख (एबीएस जीनस) यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, नॅशनल डेअरी स्कीमचे प्रकल्प समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे तसेच विभागातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या