नांदेड :- नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चालणारे दैनंदिन कामकाज आणि शहर स्वच्छता विभागाच्या कार्याचा सविस्तर आढावा दिनांक १५.०४.२०२६ रोजी **महापौर सौ.कविता संतोष मुळे** यांनी घेतला. शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करावीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे कडक निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामांचा अहवाल महापौरांकडे सादर केला.
बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करावे. जन्म-मृत्यू दाखले, कर आकारणी आणि इतर नागरी सेवांसाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कचरा संकलनाचे नियोजन अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिले. मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई करण्यावर भर देण्यास सांगितले. क्षेत्रीय स्तरावर पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ड्रेनेज लाईनची स्वच्छता आणि औषध फवारणी नियमित करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी नियमित कारवाई करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*चौकट*
"नांदेड शहराचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रीय कार्यालये हा प्रशासनाचा कणा आहेत. जर या स्तरावर कामे वेळेत झाली, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल." असे प्रतिपादन यावेळी महापौरांनी केले.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील महापौरांच्या दालनातील आयोजित या बैठकीला महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, रमेश चवरे, राजेश जाधव, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, उपअभियंता नरेंद्र सुजलेगावकर आदी उपस्थित होते.