नांदेड : बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र, नांदेड येथे २७ मार्च २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्र व युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या २० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून सुमारे २००० पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे नांदेड विभागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
हा रोजगार मेळावा नांदेड विभागीय केंद्रात आयोजित करण्यात येणार असून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना यात सहभागी होता येणार आहे. संबंधित अभ्यासकेंद्रांनी आपल्या केंद्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे
या मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता विविध प्रकारची ठेवण्यात आली आहे. सर्व शाखेतील पदवीधर, दहावी, बारावी पास नापास, आय.टी. आय, (सर्व ट्रेड), डिप्लोमा-इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इंजिनीअरींग इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, CNC ऑपरेटर, CIPET
ही शैक्षणिक पात्रता असणार आहे
रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्च स्वतः करावा लागणार आहे. मात्र उपस्थित उमेदवारांसाठी सकाळचा नाश्ता व चहाची व्यवस्था विभागीय केंद्रामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हा रोजगार मेळावा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, नानकवाडी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र, नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड विभागातील बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन रोजगार मिळवावा, असे आवाहन डॉ यशवंत कल्लेपवार वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड यांनी केले आहे.