शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीस राज्यस्तरीय गौरव

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/05/2026 9:38 PM

नांदेड : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी (ART) केंद्राने एचआयव्ही/एड्स सेवा वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आंध्रप्रदेश येथे आयोजित केंद्रीय आढावा बैठकीमध्ये “Good Performance in ART Service Delivery” या मानांकनांतर्गत महाराष्ट्र राज्यास प्रथम श्रेणीचा सन्मान प्राप्त झाला असून, या यशामध्ये नांदेड जिल्ह्यातील एआरटी विभागाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.

या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), मुंबई यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी केंद्राला अधिकृत प्रशस्तीपत्र (Letter of Appreciation) प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रशस्तीपत्रात केंद्राच्या उल्लेखनीय कार्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठबळ, दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्वामुळे शक्य झाली आहे. विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे यांच्या प्रशासकीय सहकार्याखाली तसेच नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद उबैदुल्ला खान यांच्या नेतृत्व, नियोजन व समन्वयातून एआरटी केंद्राने उत्कृष्ट सेवा मानके निर्माण केली आहेत.

या यशामध्ये एसएमओ डॉ. प्रदीप जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी, संघभावना आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मानाचा गौरव प्राप्त झाला आहे.

या अभिमानास्पद यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे, नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद उबैदुल्ला खान, एसएमओ डॉ. प्रदीप जाधव तसेच संपूर्ण एआरटी टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भविष्यातही उत्कृष्ट सेवा देत नवे मानदंड प्रस्थापित करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या