नांदेड महापालिकेच्या लेखा व वित्त विभागास ISO मानांकन प्राप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/03/2026 8:09 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल यशस्वी झाले असून, महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाला (Accounts & Finance Department) प्रतिष्ठित ISO 9001:2015 हे जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे अचूक व्यवस्थापन, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जलद सेवांची दखल घेऊन हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने महापालिकेच्या तिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन त्याचप्रमाणे १०० दिवसांचा कृती आराखडा दृष्टीपथात ठेवुन या नामांकनाच्या अनुषंगाने लेखा विभागात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास *महपौर सौ.कविता संतोष मुळे*, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा पाटील, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांच्यासह पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

लेखा विभागातील कार्यालयीन रचना, झिरो पेंडन्सी अर्थात फाईल्सचा निपटारा, सहा गठ्ठे पध्दती, अभिलेखाचे वर्गीकरण, ई-ऑफिस, अत्याधुनिक अभिलेख कक्ष आणि अद्ययावत हिशोब ठेवण्याची पध्दत एकंदरीत कामाच्या पारदर्शकतेमुळे हे यश प्राप्त झाले आहे. प्रशासकीय सुधारणा करतांना *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* आणि *मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे* यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेत वाढ केली आहे. डिजिटलायझेशन अंतर्गत आर्थिक कामकाजात संगणकीय प्रणालीचा प्रभावी वापर केल्याने त्रुटींचे प्रमाण कमी झाले आहे.

या प्रमाणपत्राचे विशेष महत्त्व असुन ISO 9001:2015 हे मानांकन गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी दिले जाते, ज्यामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढते. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाने आनंद व्यक्त केला असून, हे मानांकन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. आगामी काळात महापालिकेचे इतर विभागही अशाच प्रकारे दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपलेखापाल धोंडोपंत कुलकर्णी तर सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांनी केले. या नामांकन प्राप्तीसाठी लेखा वित्त विभागातील कार्यालय अधिक्षक सुजाता वाडियार, वरिष्ठ लिपिक दैवशाला येवते, गजानन रासे, सतपालसिंघ कोल्हापुरे आदिंनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या