अमरनाथ यात्रेच्या कार्याची दखल; दिलीप ठाकूरांना रामसेवा गौरव पुरस्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/03/2026 12:51 PM

नांदेड :- रामनवमी निमित्त कलांगण प्रतिष्ठान व श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीराम पहाट’ या सुरमयी संगीतमय सोहळ्यात २७ वेळा अमरनाथ यात्रेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर तसेच सतरा कोटी रामजप पूर्ण करणारे ॲड. व्यंकटेश पाटनुरकर यांना ‘रामसेवा गौरव पुरस्कार’ मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते शेकडो रसिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुरस्कारांची संख्या १११ वर पोहोचल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सतत चौथ्या वर्षी ‘श्रीराम पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात करण्यात आले होते. ॲड. गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मिती सहाय्यामुळे कार्यक्रम अत्यंत रंगतदार झाला.पहाटे सहा वाजता डॉ. डोईफोडे, डॉ. नितीन जोशी, डॉ. सुशील राठी, शिवप्रसाद राठी, रमेश पारसेवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

प्रशांत काळुंदेकर, प्रज्ञा देशपांडे व संज्योती जगदाळे यांनी एकापेक्षा एक सरस रामगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमन, पंढरीनाथ दरेकर, पंकज शिरभाते, भगवान देशमुख यांनी संगीताची बाजू समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे निरूपण व निवेदन नांदेड भूषण ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी अत्यंत रंगतदार शैलीत केले, तर उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले.यावेळी ॲड. व्यंकटेश पाटनुरकर व ॲड. दिलीप ठाकूर यांना भव्य मंचावर आकर्षक स्मृतीचिन्ह,महावस्त्र व भव्य पुष्पहाराने ‘रामसेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध गायिका रागिणी जोशी यांच्या प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल लता मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता ॲड. चिरंजीलाल दागडिया, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, सौ.शुभा चांडक व श्रीमती पुष्पा चांडक यांच्या हस्ते श्रीरामाची आरतीने झाली.श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रसाद राठी, रमेश मेगदे, महेश चांडक, रमेश सारडा,शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी, निलेश चांडक, माधवराव पटणे, रमेश मिरजकर, विजय बंडेवार,वेदांत भूतडा आदींनी परिश्रम घेतले.वर्षभरात तब्बल ९० उपक्रम राबवणारे ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुरस्कारांमध्ये सातत्याने वाढ होत असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या