नांदेड - समाजसेवेची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून मेंदूचे विविध विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम आणि एओसीएन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे.
शहरातील मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवार, दि. २७ मार्चपासून सुरू झालेल्या या शिबिराला शनिवार, दि. २८ मार्च रोजीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. यंदाचे हे सोळावे वर्ष असून एकूण एकोणतीसावे शिबिर ठरत आहे. प्रख्यात तज्ज्ञ डॉ. अनैता हेगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत. मागील अठ्ठावीस शिबिरांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले असून तब्बल ७ हजारांहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.या शिबिरामुळे अनेक रुग्णांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन रुग्णांना दृष्टी प्राप्त झाली आहे, तर हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहू न शकणाऱ्या रुग्णांना चालता येऊ लागले आहे. तसेच फिट्स, ऑटीझम, चालताना तोल जाणे अशा मेंदूशी संबंधित विकारांवर सातत्याने उपचार घेतल्यामुळे अनेकांनी आजारावर मात केली असून अनेक रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत.
या आरोग्य शिबिरासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाना राज्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने निवास आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, तसेच सदस्य बनारसीदासजी अग्रवाल आणि अंकित अग्रवाल हे शिबिरस्थळी उपस्थित राहून देखरेख करत आहेत. तसेच मुख्याध्यापक मधुकर मनुरकर, वसतिगृह अधीक्षक संजय शिंदे आणि दोन्ही शाळांतील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. समाजातील गरजूंसाठी आरोग्याची नवी दिशा देणारे हे शिबिर खऱ्या अर्थाने मेंदू विकारग्रस्त मुलांसाठी वरदान ठरत असून, सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण करत आहे.