नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अनंत क्लबचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच त्यांच्या बौद्धिक, सर्जनशील व सामाजिक क्षमतांचा विकास घडविणे हा या क्लब स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून दूर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी उपस्थित होते, तर प्र-कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संचालिका डॉ. रुपाली जैन यांनी सन्माननीय उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रुपाली जैन यांनी अनंत क्लबची संकल्पना व उद्दिष्टे प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी गणित व सांख्यिकी विषयांचे डेटा सायन्स व क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील वाढते महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्टार्टअप्स व उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी अनंत क्लबच्या संघटनात्मक रचनेची घोषणा करण्यात आली. फॅकल्टी कोऑर्डिनेटर म्हणून डॉ. अनिकेत मुळे, स्टुडंट प्रेसिडेंट म्हणून अनिकेत अवचार, सेक्रेटरी म्हणून निकिता गाडेकर, जॉइंट सेक्रेटरी म्हणून तनिषा पिसारीवार, तर ट्रेझरर म्हणून सचिन साळवे यांची निवड करण्यात आली. तसेच इव्हेंट कोऑर्डिनेटर्स म्हणून पूजा खानसोळे, सुधाकर जाधव, ऐश्वर्या कोकाटे आणि श्वेता नरगोडे यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
उद्घाटन सोहळ्यानंतर अनंत क्लबच्या पहिल्या उपक्रमांतर्गत “A Transformational Motivational Talk” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश निहलानी यांनी “Igniting Young Minds” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सकारात्मक विचारसरणी, ध्येय निर्धारण, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्यासह डॉ. अनिकेत मुळे, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उषा सांगळे व श्री. उदय दिव्यवीर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका सोनुने यांनी सुरेखरीत्या केले, तर आभार प्रदर्शन हिमांशू आकराते यांनी व्यक्त केले.
उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. भविष्यात अनंत क्लब विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.