नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम;पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा नांदेडमध्ये छापा,5 लाख रुपयांचा गुटखा जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/04/2026 3:22 PM

नांदेड :- दिनांक 16 मार्च, 2026 पासून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाविरुद्ध व्यापक मोहीम उघडली आहे. सदर मोहिमेच्या अनुषंगाने, विशेष पथकास पोलीस ठाणे इतवारा भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा साठवणूक केला असल्याची माहिती मिळाली होती.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक 31.03.2026 रोजी, इस्लामपुरा भागात असणाऱ्या शर्मा यांचे मळ्यातील शेडमध्ये साठवून ठेवलेला 5,03,740/- रुपयांचा गुटखा पथकाने जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपी 1) मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर रा. मदिना नगर, देगलूर नाका, नांदेड 2) शेख अमीर रा. हिमायतनगर, नांदेड 3) शेख अजिम परभणीवाला रा. परभणी व 4) बबलू शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद मुदखेडवाला, रा. मदिना नगर, मुदखेड, जिल्हा नांदेड यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाणे येथे गुरनं 93/2026 कलम 123, 274, 275, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा तपास पोलीस ठाणे इतवारा येथील पोउपनि आगलावे हे करीत आहेत.

नमूद प्रकरणात, यातील आरोपी क्रमांक 1. मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर रा. मदिना नगर, देगलूर नाका याच्याकडे सदरचा माल मिळाला आहे. या संदर्भाने, आणखी विस्तृत माहिती प्राप्त केली असता, आरोपी क्रमांक 2) शेख अमीर रा. हिमायतनगर 3) शेख अजिम परभणीवाला रा. परभणी व 4) बबलू शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद मुदखेडवाला रा. मुदखेड हे गुटखा व्यवसायात संघटितपणे कार्यरत असून, ते शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी करतात व सदर मालाची ठराविक ठिकाणी साठवणूक करून, गरजेप्रमाणे नांदेड व परभणी जिल्ह्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना त्याचा पुरवठा करतात, असे निदर्शनास आले आहे.

प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीमुळे, गुटखा खरेदी, वाहतूक, साठवणूक व वितरणासाठी आरोपींनी आणखी लोकांची मदत घेऊन, एक व्यापक जाळे उभे केले आहे. संबंधित आरोपींकडून या संदर्भात अधिक माहिती हस्तगत करून, या साखळीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, उपरोक्त प्रमाणे निष्पन्न झालेल्या व होणाऱ्या आरोपीतांचा गुन्हेगारी पूर्वेतिहास पडताळून, गुटखा निर्मूलनाच्या अनुषंगाने प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या