नांदेड :- किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रेशीम शेतीसाठी नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर न थांबता वस्त्रोद्योगाशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेतीत उद्योगाचा समावेश करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे हे शासनाचे धोरण असून, रेशीम उद्योग हा त्यासाठी अत्यंत फायदेशीर पर्याय आहे.
कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, क्षेत्र सहायक रेशीम कांचन जाधव, सहायक संचालक प्रवीण भुरके, प्रगतशील शेतकरी कपील सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला पुढे म्हणाले की, या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास शासनस्तरावर अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वैयक्तिक स्तरावरही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात व आवश्यक त्या अनुदानासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.
*नगदी पीक म्हणून रेशीम शेतीकडे वळा – अशोक वडवळे*
जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले की, पोकरा, मनरेगा व ‘सिल्क समग्र’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकरी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. समूहाच्या माध्यमातून रेशीम शेती केल्यास अधिक फायदा होऊन बाजारपेठेतही स्थिर उत्पन्न मिळू शकते.
शेतकऱ्यांनी 5 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. उत्पन्नवाढ व वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशीम शेतीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानाबाबत माहिती दिली.