नांदेड :- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी मागील पंधरावड्यामध्ये नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम उघडली होती. सदर मोहीम दिनांक 31 मार्च रोजी संपन्न झाली.
मात्र, मोहिमेचा कालावधी संपताच, गुटखा विक्रेते आपला कारभार पुन्हा सुरू करणार आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, बारकाईने पाळत ठेवली असता, एका मारुती एर्टिगा वाहनामधून प्रतिबंधित गुटखा हा लातूर जिल्ह्यातील वाढवणामार्गे अहमदपुरकडे घेवून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या बातमीनुसार, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने, दिनांक 01 एप्रिल रोजी पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील डावूळ गावाजवळ सदरची एर्टिगा थांबवली असता, सदर वाहनात विक्री करण्यासाठी घेवून जात असलेला 6,24,000/- रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर कारवाई दरम्यान, 6,24,000/- रुपयांचा गुटखा व एक मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा असा एकूण 13,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी आरोपी 1) फय्युम अब्दुल रऊफ शेख वय 43 वर्ष, व्यवसाय पानपट्टी चालक, रा. गडी गल्ली, अहमदपूर 2) निसार गफ्फार बिस्ती वय 26 वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. बागवान गल्ली, अहमदपूर व 3) मौजन आजम सय्यद, अहमदपुर यांच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाणे येथे गुरनं 83/2026 कलम 123, 62, 223, 274, 275, 3(5), भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस ठाणे वाढवणा येथील पोउपनि हालसे हे करीत आहेत.
गुटखा व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जसे, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, अपमित्रके युक्त चघळण्याची तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, पान मसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थाची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये कारवाई करण्यात येते. सदर कलमाप्रमाणे केलेल्या कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा पर्यंतच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.
सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकों / गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. मागील काही दिवसांपासून सदर पथकाने अवैध व्यवसायांच्या विरुद्ध उल्लेखनीय व धाडसी कामगिरी केली असून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
' खबर ' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांकडे पोहोचाविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.