नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आता 'डिजिटल' पाळत!'एटीएमएस' यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/04/2026 8:27 PM

नांदेड :- नांदेड ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. या मार्गावर अत्याधुनिक 'अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरील अपघातांना आळा बसण्यासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर डिजिटल पद्धतीने वचक बसणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मात्र, सतत गंभीर अपघात होत असलेल्या या महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान  खा. चव्हाण यांनी नांदेड ते पार्डी मक्ता या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. या मार्गावर तातडीने 'एटीएमएस' यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. 

या महामार्गावर बसवण्यात येणाऱ्या 'अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम'मध्ये हाय-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गाच्या प्रत्येक कोपऱ्यावर कंट्रोल रूमची नजर असेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचा क्रमांक आपोआप नोंदला जाऊन थेट ई-चलन जारी केले जाईल. महामार्गावर अपघात झाल्यास या सिस्टमद्वारे त्वरित अलर्ट मिळून रुग्णवाहिका किंवा मदतकार्य वेळेत पोहोचवणे शक्य होईल. नांदेड ते वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर बेदरकारपणे वाहने चालवण्याऱ्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे,

Share

Other News

ताज्या बातम्या