📍 जिल्हाधिकारी कार्यालय सांगली | कसबेडिग्रज येथे पेठनाका ते सांगली राष्ट्रीय महामार्ग १६६ रुंदीकरण व डांबरीकरण
पेठनाका ते सांगली राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामामधील उर्वरित प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी महोदयांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. कसबेडिग्रज येथील प्रस्तावित टोल प्लाझा परिसरात सुमारे १ किलोमीटरचा रस्ता अद्याप कच्चा असल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, तातडीने काम पूर्ण होणे आवश्यक आहे, हे बैठकीत ठामपणे मांडले.
या संदर्भात बाधित शेतकऱ्यांचा मुद्दा रास्त असून अधिग्रहणाचे योग्य मोबदले मिळाल्याशिवाय काम होऊ नये, ही त्यांची भूमिका समजून घेत, सर्वांनी समन्वयाने मध्यम मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शवली ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. या चर्चेनंतर येत्या महिन्याभरात हा उर्वरित पॅच पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून नागरिकांचा त्रास थांबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
तसेच, या मार्गावर प्रस्तावित टोल नाक्याबाबत स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्यावर टोल आकारू नये, अशी मागणी देखील करणार आहे.
नागरिकांची सुरक्षितता आणि शेतकऱ्यांचे हित या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.