महानगरपालिका व पोलीस विभागाची धडक कारवाई;जुना मोंढा टॉवर परिसर ते नविन पुलापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/04/2026 9:02 PM

नांदेड :-  शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जुना मोंढा टॉवर ते जुना मोंढा ब्रिज दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली  असुन बुधवार दिनांक २९.०४.२०२६ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने जुना मोंढा या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे. या कार्यवाही दरम्यान एका अतिक्रमण धारकास रस्त्यावर कचरा टाकल्याने तसेच अतिक्रमण केल्यामुळे *तब्बल दहा हजाराचा दंड* पालिकेमार्फत आकारण्यात आला आहे.

महानगरपालिकेने १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता त्यापैकी शहरातील मुख्य चौक सुशोभकरणासह अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणुन या कार्यवाही दरम्यान रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेले हातगाडे, फ्लेक्स बोर्ड, लोखंडी शेड आणि पक्क्या बांधकामांचे वाढीव भाग जमीनदोस्त करण्यात आले. जुना मोंढा हा व्यापारी भाग असल्याने येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने ही कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास २५ ते ३० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०४ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखेचे पवार व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, विशाल सोनकांबळे यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे यावेळी मनपा *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी स्पष्ट केले.

Share

Other News

ताज्या बातम्या