नव्या पर्वाचा प्रारंभ: सांगली-मिरज-कुपवाडच्या विकासासाठी मुख्यमंत्री सकारात्मक!
आजचा दिवस आपल्या लाडक्या सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. महापौर पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी महापौरांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या महत्त्वाच्या प्रसंगी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासोबत्त नगरसेवक दयानंद खोत आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. शहराचा कायापालट करण्यासाठी त्यांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे:
प्रमुख विकासकामे आणि सकारात्मक चर्चा:
• जागतिक बँक (World Bank) प्रकल्प: शहराच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या ६०० कोटी रुपयांच्या निधीबाबत सविस्तर चर्चा झाली. हा निधी प्राप्त करून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
• शेरीनाला प्रकल्प: शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर भर दिला.
• वारणा उद्भव योजना: शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी ही योजना जलदगतीने पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा केला.
• नूतन महापालिका इमारत: प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि आधुनिकता येण्यासाठी सुसज्ज अशा मध्यवर्ती इमारतीच्या बांधकामाला गती देणे.
• रस्ते विकास: सांगली, मिरज आणि कुपवाडमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम आणि दर्जेदार करणे.
• विशेष निधी: तिन्ही शहरांच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष तातडीचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी केली.
आज मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या या भेटीमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने आपण ‘सुंदर आणि प्रगत सांगली-मिरज-कुपवाड’ हे स्वप्न लवकरच साकार करू!, असे प्रतिपादन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी केले.