नांदेड :- एचटीबीटी कापुस बियाणे विक्री, साठवणूक व वाहतुक या विरोधात प्रथम कायदेशीर कार्यवाही करुन पोलीसांनी गुन्हे दाखल करावेत. तसेच क्षेत्रीय स्तरावर जिल्हास्तरीय पथकामार्फत एचटीबीटी जिनची तपासणी करण्यात यावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यावर सक्त कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
किडरोग सल्ला प्रकल्पाचे सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची पुर्नबांधनी करणे, देखरेख/दक्षता पथकाची स्थापना करणे, कपाशी पिकातील तण नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना लहान यंत्रे उपलब्ध करुन देणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे, फिरते तपासणी किट उपलब्ध करुन देण्याबाबत नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कापाशी लागवडीची तयारी सुरू झाली आहे मात्र यासंधीचा फायदा घेत बाजारात अनधीकृत आणि बंदी असलेले एचटीबीटी बियाणे विक्रीची शक्यतानिर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्हयात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषि व पोलीस यंत्रणेच्या सहभागातुन एचटीबीटी कपाशी बियाणे संदर्भात जिल्हासमन्वय समिती स्थापन करण्यात आली.
अवैध कंपन्याकडुन उत्पादनात वाढ व खर्चाच्या बचतीचे खोटे दावे करण्यात येतात. खरे तर या बियाणांमुळे जमीनीचा पोत बिघडु शकतो आणि पर्यावरणाला हाणी पोहचु शकते, त्यामुळे कोणत्याही कृषि विद्यापीठाने या बियाणाची शिफारस केली नाही. बिटी कपाशीमध्ये बोंडअळीला रोखण्याची क्षमता असते मात्र एचटीबीटी कपाशी बियाणामध्ये हर्बिसाइड टॉलरंट हाअतिरीक्त जीन असतो यामुळे ग्लायफोसेट सारखे तणनाशक फवारल्यावर तण मरते पण कापुस जिवंतराहतो. वरकरणी हे फायदेशीर वाटत असले तरी याचे पर्यावरणावर गंभीर दुष्परीणाम होतात.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कापूस संशोधन केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंदपांडागळे, कृषि विकास अधिकारी निलकुमार ऐतवडे, मोहीम अधिकारी सचीन कपाळे, तालुका कृषि अधिकारी नांदेड, मुदखेड, भोकर, माहुर, कंधार, उमरी व किनवट, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे हे उपस्थित होते.