नांदेड :-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे 'एक पाऊल थॅलेसेमियामुक्तीकडे' या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त आणि 'जागतिक थॅलेसेमिया दिनाचे' (८ मे) औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात १ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत थॅलेसेमिया मुक्त अभियान सप्ताह'आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने हा सप्ताह व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे.
या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम आणि संकल्पना (Themes):
१ मे – संकल्प व उद्घाटन (Theme: Commitment to Prevention): आरोग्य संस्थांमध्ये थॅलेसेमिया निर्मूलनाची शपथ घेणे आणि डिजिटल कॅम्पेनची सुरुवात केली जाईल.
२ मे – शाळा व महाविद्यालय जनजागृती (Theme: Test Before Marriage):तरुणांमध्ये लग्नापूर्वी तपासणीची (Premarital Screening) गरज पटवून देण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातील. स्थानिक नेते/ सेलिब्रिटी यांचा सहभाग वाढवला जाईल.
३ मे – आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण (Theme: Capacity Building): आशा, ANM आणि MPW यांना लवकर निदानासाठी आणि फील्ड-लेव्हल रिपोर्टिंगसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
४ मे – गर्भवती महिला व कुटुंब सल्ला (Theme: Healthy Future Generation):ANC क्लिनिकमध्ये गर्भवती मातांचे समुपदेशन आणि हाय-रिस्क जोडप्यांची यादी तयार केली जाईल.
५ मे – रुग्ण सहाय्य व रक्तदान (Theme: Care for Existing Patients):थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबिरे आणि मोफत औषध वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
६ मे – तपासणी (Screening) दिवस (Theme: Know Your Status):१८ ते ३५ वयोगटातील व्यक्ती आणि लग्न ठरलेल्या जोडप्यांची HPLC व CBC तपासणी केली जाईल.
७ मे – जनजागृती रॅली व मीडिया दिवस (Theme: Mass Awareness Movement): जिल्हा व तालुका स्तरावर रॅली काढून रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जाईल.
*८ मे – जागतिक थॅलेसेमिया दिन: जिल्हास्तरावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करून आरोग्य मोहिमेचा आढावा घेतला जाईल.
अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये:
डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सप्ताहात खालील महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल:
* पहिल्या तिमाहीतील सर्व नोंदणीकृत गर्भवती मातांची HPLC तपासणी अनिवार्यपणे केली जाईल.
* जिल्ह्यातील सर्व थॅलेसेमियाग्रस्त बालकांची संख्या निश्चित करून त्यांची MJPJAY योजनेअंतर्गत नोंदणी केली जाईल.
* सर्व बाधित बालकांना शासनाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
थॅलेसेमियामुक्त जिल्हा घडवण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः तरुण जोडप्यांनी आणि गर्भवती मातांनी या सप्ताहात आयोजित तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.