अहिल्यानगर, दि. २५- केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील तरतुदीनुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असून वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांनाही एचएसआरपी बसविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.
जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने परिवहन आयुक्तांनी यापूर्वी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर एचएसआरपी बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या सर्व वाहनांवर (जुनी व नवी) मोटार वाहन कायद्यानुसार वायूवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार असून वाहनधारकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तातडीने एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहनही श्री. ठोके यांनी केले आहे.
एचएसआरपीसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. वाहनांची ओळख, सुरक्षितता आणि बनावट क्रमांक प्लेटला आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्रणाली महत्त्वाची असल्याचेही कळविण्यात आले आहे.
#HSRPनंबरप्लेट #HSRPPlate2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #परिवहनविभाग #RTOUpdate #वाहनसुरक्षा #VehicleSafety #प्रादेशिकपरिवहन #RTOAhilyanagar