अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'येलो अलर्ट' नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 31/05/2026 6:42 PM



अहिल्यानगर, दि. ३१ मे :- भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मे ते ३ जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा व कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.

वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये व धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढू नये.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

#हवामानअंदाज #WeatherAlert2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #येलोअलर्ट #YellowAlert #वादळीपाऊस

Share

Other News

ताज्या बातम्या