नांदेड विभागाची मे 2026 मध्ये सर्वकालीन सर्वोत्तम तिकीट तपासणी कामगिरी; 1.72 कोटी रुपयांच्या विक्रमी महसुलाची नोंद

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/06/2026 7:32 PM

नांदेड:-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने मे -2026  महिन्यात तिकीट तपासणी मोहिमांमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत विभागाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम मासिक कामगिरीची नोंद केली आहे. सघन तिकीट तपासणी मोहीमा, प्रभावी नियोजन आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे विभागाने रेल्वे महसूल संरक्षण, प्रवासी शिस्त आणि सेवा गुणवत्तेच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मे-2026 दरम्यान विभागातील विविध रेल्वे गाड्या व स्थानकांवर व्यापक तिकीट तपासणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण तपासणी मोहिमांमुळे एकूण 28,944 विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली. त्यातून ₹1,72,85,460 इतका विक्रमी महसूल रेल्वेला प्राप्त झाला. नांदेड विभागाच्या इतिहासात एका महिन्यात तिकीट तपासणीद्वारे मिळालेला हा सर्वाधिक महसूल असून, विभागाच्या महसूल संरक्षण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे हे द्योतक आहे.
प्रवाशांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच प्रवास नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी विभागात विशेष तिकीट तपासणी मोहिमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये खालील मोहिमांचा समावेश होता :
• 03 भव्य तिकीट तपासणी मोहीमा (Massive Ticket Checking Drives)
• 01 मेजीसस्ट्रेट विशेष तपासणी मोहीम (Magistrate Checking Drive)
•      18   फोर्ट्रेस तपासणी मोहीमा (Fortress Checks)
या व्यापक तिकीट तपासणी व अंमलबजावणी मोहिमांच्या यशामध्ये 33  तिकीट तपासणी पथक कर्मचारी, 174 अमेनिटी कर्मचारी आणि 18  स्टेशनरी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच या मोहिमा रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या समन्वयाने प्रभावीपणे राबविण्यात आल्या.
महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आणि प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमांमुळे विनातिकीट व अनियमित प्रवासाच्या प्रकरणांचा शोध घेणे, महसूल गळती रोखणे आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालणे अधिक प्रभावीपणे शक्य झाले.
तिकीट तपासणी मोहिमांचा उद्देश केवळ महसूलवाढ नसून, वैध तिकीट खरेदी करून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवास आणि इतर प्रवासातील अनियमितता रोखल्यामुळे डब्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होते. तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढते, प्रवासातील शिस्त कायम राहते आणि एकूणच प्रवासाचा दर्जा सुधारतो. या मोहिमांमुळे रेल्वेच्या सुविधांचा योग्य व न्याय्य लाभ खऱ्या प्रवाशांना मिळण्यास मदत होते.
नांदेड विभाग रेल्वे महसूलाचे संरक्षण, प्रवासातील शिस्तीचे पालन आणि प्रवासी सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व रेल्वे प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासीहितैषी रेल्वे व्यवस्था राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या