लातूर जिल्हा प्रतिनिधी - राजकुमार भंडे
आज मा. अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर जिल्हा कार्यालयास श्री. राजेश नरसिंहराव रानडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या प्रलंबित अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री. रानडे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद लातूरच्या शिक्षण विभागाकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला असतानाही आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. संबंधित विभागाकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे जिल्हा सचिव तथा RTI कार्यकर्ता मंचाचे अध्यक्ष श्री. रामेश्वर बाबुराव सुर्यवंशी यांनी श्री. रानडे यांच्या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास करून माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत आवश्यक माहिती प्राप्त करण्यासाठी सविस्तर माहिती अधिकार अर्ज तयार करून दिला.
सदर अर्जामध्ये अनुकंपा नियुक्ती संदर्भातील प्रकरणाची सद्यस्थिती, अर्जाची नोंद, प्रतीक्षा यादीतील क्रमांक, संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही, नियुक्ती न देण्याची कारणे तसेच संबंधित अभिलेखांची माहिती मागविण्यात आली आहे.
श्री. सुर्यवंशी यांनी श्री. रानडे यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत उपलब्ध असलेले अधिकार, प्रथम अपील व द्वितीय अपील याबाबतही सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनाकडून माहिती न मिळाल्यास अथवा न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी श्री. राजेश नरसिंहराव रानडे यांनी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले व न्याय मिळविण्यासाठी पुढील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
"सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी माहितीचा अधिकार हे प्रभावी शस्त्र असून प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे," असे प्रतिपादन जिल्हा सचिव श्री. रामेश्वर बाबुराव सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
– कार्यालय प्रसिद्धी विभाग
मा. अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर
RTI कार्यकर्ता मंच, लातूर