नांदेड :- फुले,शाहू,आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बाल संस्कार केंद्र,श्रावस्ती नगर,नांदेड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत Spoken English प्रशिक्षण वर्गाला सोमवार (दि.8 जून) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह रोजगार,करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.ही गरज लक्षात घेऊन आयुध MS-CIT चे संचालक नितीन तारू सर यांनी विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत Spoken English प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढविणे, इंग्रजी बोलण्याची भीती दूर करणे,दैनंदिन संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच मुलाखत,सादरीकरण आणि विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये प्रभावी संवाद साधण्याची क्षमता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नितीन तारू हे आपल्या शैक्षणिक अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना निःस्वार्थपणे देत असून त्यांचे हे कार्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.या उपक्रमात नितीन कापुरे यांचेही विशेष सहकार्य लाभत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत.दररोज सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत आयुध MS-CIT,सावित्रीबाई फुले नगर,नांदेड येथे हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण इंग्रजी प्रशिक्षण उपलब्ध व्हावे,या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या यशस्वी प्रारंभाबद्दल फुले,शाहू,आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय,अभ्यासिका व बाल संस्कार केंद्राच्या वतीने नितीन तारू सर आणि नितीन कापुरे सर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्यात आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.