अहिल्यानगर : दरोड्याच्या दोन गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. शरद कैलास काळे (वय ४२, रा. कडुस, ता. पारनेर, हल्ली रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास औरंगपूर (ता. अकोले) येथे घरातील सर्वजण झोपलेले असताना चार अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून नेले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमालही चोरून नेला.
या प्रकरणी अशोक केरू वाळुंज (रा. औरंगपूर, ता. अकोले) यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी अजय सादिश काळे आणि अक्षय उर्फ सोन्या अर्पन भोसले या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला असता शरद काळे हा पाडळी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पुढील तपासासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.