नांदेड :- क्रीडा व युवक सेवांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा रविवारी (१४ जून) श्री मोदी मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळा, क्रीडा संस्था व अकादमींच्या एकूण ८० महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धांचे आयोजन 'वर्ल्ड सायकल डे' निमित्त करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नांदेड जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर, नेहरू युवा केंद्र तथा मेरा भारतच्या अधिकारी अश्नी कनकटे, संतोष कुलकर्णी, नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रलोभ कुलकर्णी, नांदेड जिल्हा ॲमॅच्युअर सायकलिंग असोसिएशनचे सचिव बन्टी सोनसळे, कांचन मस्के व उद्देश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात अनुष्का जिकलवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला. जागृती गजभारे हिला द्वितीय, तर नियती पातेवार हिला तृतीय क्रमांक मिळाला.
१७ वर्षांखालील गटात कोमल पवार हिने अव्वल स्थान मिळविले. सोनाक्षी सोनसळे हिने द्वितीय क्रमांक, तर मानवी कदम आणि तनक कोल्हे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षांखालील गटात समीक्षा आढाव हिने प्रथम क्रमांक मिळवित विजेतेपद पटकावले. श्रद्धा जाधव हिला द्वितीय, तर नागेश्वरी चित्तारे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल (पुयणी), नारायणा स्कूल विष्णुपुरी, टायगर करिअर मार्शल आर्ट कुंगफू-कराटे असोसिएशन, रुद्रा कराटे अकॅडमी तसेच नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून निलेश खराटे, गोविंद पांचाळ, वैभव अभोरे, वैभव दोमोकोंडवार, साई सोनसळे, विष्णू शिंदे, साधना चिकणे, राजू कोल्हे, चंद्रकांत आढाव, भंडारी सर आणि सुभाष लोखंडे यांनी काम पाहिले. तसेच शहर वाहतूक शाखा, नांदेड आणि शासकीय रुग्णालय, नांदेड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बंटी सोनसळे, संतोष सोनसळे, वैभव दमकोंडवार, निलेश खराटे, गोविंद पांचाळ ,चंद्रकांत आढाव ,विष्णु शिंदे, वैभव अंबोरे, साईनाथ सोनसळे, कांचन मस्के यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना त्यांच्या पालकासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. महिला सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, जिल्ह्यातील महिला क्रीडा क्षेत्राला यामुळे नवी उभारी मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.