वाढीव घरपट्टी संदर्भात हरकती स्विकारण्यास मुदतवाढ द्या : वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/06/2026 12:42 PM

प्रति,मा. आयुक्त महोदया,सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.

विषय : वाढीव घरपट्टी संदर्भातील हरकती स्वीकारण्याच्या प्रक्रियेमधील गोंधळ दूर करून मुदतवाढ देणे व हरकतदारांना लेखी उत्तर देण्याबाबत.

महोदया,

सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढीव घरपट्टी संदर्भातील नोटिसा वितरित करण्यात आलेल्या असून त्याविरोधात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल केल्या जात आहेत. मात्र सद्यस्थितीत घरपट्टी विभागामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सध्या हरकत नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रथम एका ठिकाणी फॉर्म जमा करावा लागत आहे व त्यानंतर सुनावणीची तारीख घेण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जावे लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिव्यांग नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरपट्टी विभागासमोर दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तसेच हरकती फक्त दुपारी ३ वाजेपर्यंतच स्वीकारल्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या नियमित कामकाजाच्या वेळेनुसार दिवसभर हरकती स्वीकारल्या जाव्यात. दुपारी ३ वाजेची मर्यादा कोणत्या नियम अथवा आदेशानुसार लावण्यात आली आहे याबाबत स्पष्टता करण्यात यावी.

ऑनलाईन पद्धतीने हरकती दाखल करणाऱ्या अनेक नागरिकांच्या सुनावण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेल्या नोटिसांवरील हरकती दाखल करण्याची मुदत संपत आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना न्याय मिळण्यासाठी हरकती दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.

तसेच ज्या नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत त्या प्रत्येक हरकतदाराला त्याच्या हरकतीवरील निर्णयाचा लेखी आदेश देणे कायद्याने आवश्यक आहे. संबंधित हरकत मान्य करण्यात आली अथवा फेटाळण्यात आली असल्यास त्याची कारणे स्पष्टपणे नमूद करून लेखी उत्तर देण्यात यावे. कोणत्या त्रुटीमुळे दुरुस्ती करण्यात आली, कोणत्या कारणास्तव हरकत अमान्य करण्यात आली याची संपूर्ण माहिती संबंधित मालमत्ताधारकाला देणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे.

त्यामुळे आपणास विनंती आहे की,

१) हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ व एकाच ठिकाणी करण्यात यावी.२) हरकती स्वीकारण्याची वेळ संपूर्ण कार्यालयीन वेळेत ठेवण्यात यावी.३) ऑनलाईन दाखल हरकतींच्या सुनावण्या तात्काळ घेण्यात याव्यात.४) पहिल्या टप्प्यातील नोटिसांवरील हरकतींसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात यावी.५) प्रत्येक हरकतदाराला कारणासह लेखी उत्तर देण्यात यावा.६) घरपट्टी विभागातील नियोजन सुधारून नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करण्यात यावी.

सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.

आपले विश्वासू,

सतीश साखळकरहनमंत पवारव्ही. डी. बर्वेरवींद्र वळवडेडॉ. ज्ञानचंद्र पाटीलशंभूराज काटकरआनंद देसाई

वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीसांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र

Share

Other News

ताज्या बातम्या