नांदेड :- वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी जिल्ह्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असून इच्छुक ग्रामपंचायती, संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३० जून २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांनी केले आहे.
राज्यात पुस्तकांचे गाव निर्माण करताना सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता या उपक्रमात सहभागी व्हावे. या उपक्रमात व्यापक लोकसहभाग असणे आवश्यक असून त्याबाबतचा उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामध्ये असणे बंधनकारक आहे. प्रत्येक ग्रंथदालनाचे क्षेत्रफळ किमान १५० चौ. फूट असावे तसेच संबंधित जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यासाठी किमान पाच वर्षांचा करार करणे बंधनकारक राहणार आहे. गावातील परिस्थितीनुसार उपलब्ध दालनांची संख्या व आकारमान कमी-जास्त असू शकते. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मराठी विकास संस्था घेणार आहे.
‘पुस्तकांचे गाव’ निवडीसाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत व ‘क’ वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपरिषदेचा ठराव आवश्यक राहील. शासनाने घोषित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा असलेली गावे, राज्य किंवा केंद्र संरक्षित स्मारके असलेली गावे तसेच संत गाडगेबाबा, आदर्श गाव, तंटामुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच साहित्यिक किंवा वाङ्मयीन चळवळीची परंपरा असलेल्या गावांचाही विचार केला जाणार आहे.
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मराठी भाषा समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करून पात्रतेचा अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर गावाची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या गावात सुरुवातीला किमान दहा ग्रंथदालने सुरू करण्यात येतील. या दालनांसाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. उपलब्ध जागा, वाचन संस्कृतीची परंपरा आणि पर्यटन विकासाची क्षमता या बाबींचा विचार करून गावाची निवड केली जाईल. केवळ पुस्तक विक्री किंवा प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वाचन प्रेरणा, साहित्यिक उपक्रम, ग्रंथदालने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानकेंद्र उभारून मराठी साहित्यविश्वाचे दर्शन घडविणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी मराठी भाषा विभागाचा ३० जानेवारी २०२६ रोजीचा शासन निर्णय पाहावा. इच्छुक मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. ३० जून २०२६ पर्यंत संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या नावे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व डिजिटल उपकेंद्र नांदेड बहुउद्देशीय सांस्कृतिक संकुल श्री गुरुगोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर ,नांदेड येथे तीन प्रतींमध्ये सादर करावेत.
या उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी 8355966561 किंवा 9834276257 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.