नांदेड - जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रिक्त ८६ केंद्रप्रमुख पदांसाठी आज समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शिक्षण संचालक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक तसेच पदोन्नत मुख्याध्यापक यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
यानुसार जिल्ह्यातील केंद्रप्रमुख संवर्गातील ८३ सर्वसाधारण व ३ दिव्यांग अशा एकूण ८६ रिक्त पदांसाठी आज समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे व प्रज्ञा भवरे, प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, शिवसांब चेंडू, मंगेश ढेंबरे, अनिल भेदे तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदांच्या मोठ्या प्रमाणावरील रिक्त जागा लक्षात घेऊन सर्व तालुक्यांतील रिक्त पदांचा ७५ टक्के तालुका समतोल साधत अनुशेष भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये समप्रमाणात केंद्रप्रमुखांची नियुक्ती करणे शक्य झाले.
समुपदेशन प्रक्रियेदरम्यान अनेक शिक्षकांनी स्वेच्छेने किनवट व माहूर या पेसा तालुक्यांमध्ये नियुक्तीसाठी पसंती दर्शविली. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार व सोयीच्या केंद्रांवर नियुक्ती मिळाल्याने संपूर्ण प्रक्रिया विनातक्रार पार पडली. नियुक्ती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियोजनाबद्दल नवनियुक्त केंद्रप्रमुखांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.