*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांचा संवेदनशील पुढाकार; आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
भगूर, दि. — आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त भगूर नगर परिषदेतर्फे आज भगूर शहरातील एकल (विधवा) महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने एकल महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे सहभागी करून घेणे हा होता.
यावेळी उपस्थित महिलांना विधवा पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, विविध शासकीय कल्याणकारी योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी भगूरचे तलाठी कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांच्या शंकांचे निरसन केले तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की, "एकल महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे एवढेच आमचे उद्दिष्ट नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, हा भगूर नगर परिषदेचा संकल्प आहे. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य नगर परिषद करेल."
त्या पुढे म्हणाल्या की, एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भविष्यात विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार उपक्रम, बचत गटांचे बळकटीकरण आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे, नगरसेविका तथा महिला व बालविकास सभापती सौ. लता थापेकर, नगरसेविका सौ. सुजाता शिरसाट, सौ. विद्या बलकवडे, भगूर नगर परिषदेच्या अधिकारी सौ. चित्रा भौरे, तसेच भगूर शहरातील असंख्य एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या माध्यमातून एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाली, त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम करण्याच्या दिशेने भगूर नगर परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.