ग्रामविकास मंत्र्यांच्याच तालुक्यात महसूल विभागाचा बोजवारा! पिंगळी बुद्रुक तलाठी कार्यालय दीड वर्षांपासून पत्रेविना;

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 09/07/2026 1:39 PM

 कंत्राटदारावर कोणाची मेहरनजर?

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(दहिवडी /प्रतिनिधी)

माण (सातारा): राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्याच तालुक्यात प्रशासनाच्या कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पिंगळी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारतीला मंजुरी मिळूनही दीड वर्ष उलटले, मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच जुन्या कार्यालयावरील पत्रे कंत्राटदाराने काढून नेल्याचा आरोप असून, कार्यालय आजही पत्रेविना असल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळा, उन्हाळा आणि वादळी वाऱ्यांचा सामना करत कर्मचारी व नागरिकांना कार्यालयीन कामकाज करावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या कार्यालयाची अशी अवस्था असताना संबंधित अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यात नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नवीन इमारतीचे काम रखडण्यामागचे कारण काय? पत्रे काढून घेतल्यानंतर दीड वर्षांपासून कार्यालयाची दुरुस्ती का झाली नाही? या विलंबाला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

ग्रामविकास मंत्र्यांच्याच तालुक्यात सरकारी कार्यालयाची अशी दयनीय अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणत्या दर्जाच्या सुविधा मिळत असतील, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून विलंबास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच पिंगळी बुद्रुक तलाठी कार्यालयासाठी मंजूर झालेल्या नवीन इमारतीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




Share

Other News

ताज्या बातम्या