नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही योजना १ जुलै २०२६ पासून आपले सरकार पोर्टलवर राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत असल्याने काही वेळा सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करण्यात अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच विविध कलावंत संघटनांनीही अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शासनाकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना अर्ज करण्याची पुरेशी संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले सरकार पोर्टलवर आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.