नांदेड :- संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वप्नरंग नाट्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर कविता मुळे यांनी नांदेडमध्ये अशा दर्जेदार नाट्य महोत्सवांचे सातत्य कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच संस्थेच्या पाठीशी महानगरपालिका व स्वतःचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर कविता मुळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपकसिंग रावत, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळेकर, लक्ष्मण संगेवार आणि डॉ. राम चव्हाण उपस्थित होते.
प्रास्ताविकात स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश कवडे यांनी महोत्सवामागील भूमिका, उद्देश आणि भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. नाट्यकलेचे संवर्धन आणि विविध भागांतील रंगकर्मी एकत्र आणण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली. उपमहापौर दीपकसिंग रावत यांनी हा महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा आणि मराठवाड्यातील कलावंतांचा अधिकाधिक सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटक डॉ. विजयकुमार माहुरे यांनी नांदेडची रंगभूमी अधिक गतिमान करण्यासाठी अशा नाट्य महोत्सवांची नितांत गरज असल्याचे सांगितले. शासनाने सातत्याने कलावंतांच्या पाठीशी उभे राहून अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी स्वप्नरंग नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
उद्घाटनानंतर माणूस फाऊंडेशन, मुंबई प्रस्तुत डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस या दर्जेदार मराठी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महोत्सवात ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता व्यक्ती, पुणे प्रस्तुत धनंजय सरदेशपांडे लिखित फारच टोचलं, रात्री ८.३० वाजता खुपसा डायरी आणि रात्री ९.३० वाजता नाट्यस्पंदन, लातूर प्रस्तुत आनंद ओवरी या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधांशू सामलेटी, किरण कवडे, गौतम गायकवाड, शांती देसाई आणि संदेश महाबळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.