अर्धापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धापूर, भोकर, मुदखेड व हदगाव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन बैठकीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कै. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय टेंगसे यांनी, “विद्यार्थ्यांनी खेळाकडे केवळ छंद म्हणून न पाहता त्याला करिअर म्हणून स्वीकारावे. क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास निर्माण करून त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध शासकीय सेवा व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना योग्य दिशा देणे ही क्रीडा शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व पटवून देत त्यांच्यातील क्रीडा कौशल्य विकसित करावे, असेही डॉ. टेंगसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय टेंगसे होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूरचे मुख्याध्यापक अरुण कल्याणकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव मदने, हदगाव तालुका क्रीडा संयोजक अजय चौधरी, मुदखेड तालुका क्रीडा संयोजक अमृत जाधव, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, भोकर तालुका क्रीडा संयोजक लक्ष्मण कोखले, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख विक्रम कुंटूरवार व डॉ. काजी मुख्तारोदीन यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गुलाबराव मदने यांनी शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील विविध बाबींवर मार्गदर्शन करून नवीन क्रीडा पोर्टलच्या अपडेटनुसार सर्व क्रीडा शिक्षकांनी कामकाज करावे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शासकीय क्रीडा स्पर्धा खेळाडूंचा सहभाग वाढवावा असे आवाहन केले.
उद्घाटनपर मनोगतात मुख्याध्यापक अरुण कल्याणकर यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षणाच्या शुभेच्छा देत प्रत्येक खेळाडूची प्लेयर आयडी अचूकपणे तयार करून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन केले.
यावेळी क्रीडा शिक्षकांना ऑनलाइन शाळा रजिस्ट्रेशन, क्रीडा शिक्षक रजिस्ट्रेशन, पासवर्ड मिळविणे, खेळाडू आयडी तयार करणे, प्राथमिक फॉर्म भरणे तसेच विद्यार्थी संख्येनुसार शुल्क भरणे आदी ऑनलाइन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. प्रशिक्षणास अर्धापूर, भोकर, मुदखेड व हदगाव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.