पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६;३.५५ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध; नांदेड जिल्ह्यातील ३९ हजार २५५ शेतकऱ्यांचा समावेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/09/2026 7:48 PM

नांदेड  : राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ३९ हजार २५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते दि. ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले तसेच दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जास दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून कर्ज खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी दि. २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२ लाख ५८ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.
आता पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट-अ तसेच बँकनिहाय यादी परिशिष्ट-ब मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्या संबंधित बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतींमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

*आधार प्रमाणीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना*

प्रसिद्ध करण्यात आलेली ही कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी असून, यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची दि. ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती विचारात घेण्यात आली आहे. दि. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांच्या दि. ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे.
योजनेतील मृत लाभार्थी, वयोवृद्ध लाभार्थी तसेच बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरण होण्यास अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.
दुसऱ्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कर्जखात्याची दि. ३१ मार्च २०२६ रोजीची स्थिती तपासून नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या