उध्योजक व कामगार विभाग सुसंवाद व समन्वय समितीची दुसरी बैठक संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/09/2026 8:06 PM

 सांगली जिल्ह्यात औद्योगिक विकासास पोषक व उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या उद्योजक व कामगार विभाग सुसंवाद व समन्वय समितीची दुसरी बैठक आज दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉमर्स, एमआयडीसी कुपवाड येथे संपन्न झाली.

जिल्हाधिकारी, सांगली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योगस्नेही धोरणास अनुसरून उद्योजक व कामगार विभाग यांच्यामध्ये सातत्यपूर्ण संवाद, परस्पर विश्वास आणि प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीची पहिली बैठक दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

सहाय्यक कामगार आयुक्त, सांगली यांनी समितीच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगली जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देणे तसेच कामगारांचे कायदेशीर हक्क, सुरक्षितता व कल्याण यांचे प्रभावी संरक्षण करणे याबाबत कामगार विभागाची भूमिका स्पष्ट केली.

उद्योजक आणि कामगार विभाग यांच्यामध्ये सातत्यपूर्ण संवाद व परस्पर विश्वास निर्माण झाल्यास कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत उद्भवणारे गैरसमज तसेच व्यावहारिक अडचणी सुरुवातीच्या टप्प्यावरच दूर करता येऊ शकतात. या अनुषंगाने समिती ही उद्योजक व कामगार विभाग यांच्यातील प्रभावी संवाद, समन्वय व समस्या निराकरणासाठी व्यासपीठ म्हणून कार्य करेल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

बैठकीमध्ये विविध औद्योगिक आस्थापनांशी संबंधित कामगार विषयक बाबी, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीतील व्यावहारिक प्रश्न तसेच उद्योग व कामगार विभाग यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सदस्यांनी आपली मते मांडली.

यावेळी समितीच्या माध्यमातून उद्योगांच्या अडचणी समजून घेणे, कामगार विषयक प्रश्नांवर संवादातून मार्ग काढणे, कायद्यांच्या पालनाबाबत मार्गदर्शन करणे आणि उद्योग व कामगार विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे यावर भर देण्यात आला.

बैठकीस सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री. निलेश येलगुंडे, समितीचे सदस्य श्री. सतीश मालू, श्री. रमेश आरवाडे, श्री. रवींद्र बेंडखळे, श्री. सर्जेराव यादव, श्री. सुशील हडदरे, तसेच सौ. अर्चना पवार उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच कामगारांचे हक्क व कल्याण यांचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारचा सातत्यपूर्ण संवाद व समन्वय भविष्यातही कायम ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या