शिंदे रवीकुमार
भारतीय पत्रकार अधिकार परिषद, महाराष्ट्र राज्य सचिव | हिंदी मराठी पत्रकार संघ, तालुका संघटक | माहिती अधिकार कार्यकर्ता
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश; पाणीपट्टी माफीचा निर्णय लवकरच, टँकरचे पाणी फिल्टर करून देणार
अहिल्यानगर, दि. २४ : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत नागरिकांना आवश्यक असलेले पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे ही काळाची गरज असून, नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.
नेवासा तालुक्यातील पाणीटंचाई आणि उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत लक्ष्मी मंगल कार्यालयात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, नगराध्यक्ष करणसिंह घुले, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी स्वप्नील काळे, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीने वापरला जावा, यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. पाणी संवर्धनासाठी नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.
पाणीपट्टी माफीचा निर्णय लवकरच
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीपट्टी माफ करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान, पाण्याची गळती आणि अपव्यय रोखण्यासाठी मुळा व प्रवरा नदीवरील खराब झालेल्या बंधाऱ्यांच्या फळ्या तातडीने बदलण्यात येणार आहेत. उपलब्ध पाण्याचा अपव्यय होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन
सिंचनासाठी शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येतील. उपलब्ध फिडरवरून शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्याबाबतही संबंधित यंत्रणांना सूचना करण्यात येतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.
वांबोरी चारीचा दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत
वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा अधिकाधिक लाभ शेतकरी आणि नागरिकांना मिळवून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशनच्या कामांचा स्वतंत्र आढावा
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. अपूर्ण कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी मिळणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
टँकरचे पाणी फिल्टर करून नागरिकांना देणार
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तालुक्यातील काही पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याचा तसेच काही ठिकाणी वीज बिल थकीत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी टँकरमध्ये पाणी भरतानाच फिल्टरद्वारे पाणी शुद्ध करून नागरिकांना देण्याचा निर्णय पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतल्याचे आमदार लंघे पाटील यांनी सांगितले.
नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही
बैठकीत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, सिंचन योजनांचा विस्तार, माका परिसरातील पाणीप्रश्न, बंधाऱ्यांच्या चाऱ्यांची दुरुस्ती, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि घोणेगाव येथील पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीतून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या सर्व मागण्यांची संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.
शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांची मदत
यावेळी डॉ. अशोक ढगे यांनी शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक मदत व दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
प्रशासनासमोर आता पाणी नियोजनाचे मोठे आव्हान
ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पाणीगळती रोखणे, टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनांना गती देणे या उपाययोजनांमुळे नेवासा तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
—