पोलीस उपायुक्त शेखर बागडे यांना 'आदर्श अधिकारी पुरस्कार' प्रदान; *भगूरच्या सुपुत्राचा ठाण्यात बहुमान*
भगूर, नाशिक प्रतिनिधी:-
दैनिक 'लोकमत' आणि 'वेदनहर्ता आयोडेक्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात पोलीस उपायुक्त शेखर बागडे यांना 'आदर्श अधिकारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. ठाणे येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल (आय.ए.एस.) यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील उत्कृष्ट महापालिका अधिकारी, प्राध्यापक तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कल्याणकारी व्यक्ती व संस्थांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये भगूरचे सुपुत्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ असलेल्या शेखर बागडे यांना त्यांनी पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा विशेष बहुमान मिळाला.
तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल
पोलीस उपायुक्त शेखर बागडे यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत आव्हानात्मक आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास केला आहे. विशेषतः गाजलेला 'जर्मन बेकरी बॉम्बस्फोट तपास' आणि एका निष्पाप लहान मुलाच्या 'अपहरण प्रकरणाचा लावलेला शोध' यांसारख्या कौशल्याने केलेल्या तपासांची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*भगूरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव*
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्र सृष्टीतील आघाडीचे वृत्तपत्र 'लोकमत' आणि 'आयोडेक्स' यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण भगूर शहरात आनंदाचे वातावरण आहे.
गोरगरिबांना नेहमी मदत करणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आणि पदाचा कोणताही बडेजाव न बाळगणारे पोलीस उपायुक्त शेखर बागडे हे भगूरचे खरे भूषण आहेत, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती, भगूर यांच्या वतीने बागडे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस व सेवेस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.