नांदेड :- श्री क्षेञ माळेगाव याञञा मिडीया सेंटर, दि. 19 डिसेंबर- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा यात्रेला अनेक वैशिष्ट्यांची परंपरा लाभलेली आहे. देवदर्शनासोबतच घोड्याचे माळेगाव म्हणून ओळख मिळवून देणारा येथील भव्य घोडेबाजार हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेत देशभरातून विविध जातींचे घोडे दाखल झाले असून घोडेबाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाब, सारंगखेडा मंडी यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड येथून घोडे व्यापारी व अश्वप्रेमी मोठ्या संख्येने माळेगावात दाखल झाले आहेत. घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत सिंध, काठेवाड, मारवाड, पंजाब, नुकरा, स्टॅलियन, बाॅडा आदी जातींचे आकर्षक अश्व पाहायला मिळत आहेत.
घोडे खरेदी-विक्री करताना खरेदीदारांकडून सखोल चाचणी घेतली जाते. घोड्यांची चाल, ताकद, उंची, सौंदर्य, शिस्त व प्रशिक्षण यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे पाहणी केली जाते. अनेक विक्रेते घोड्यावर स्वार होऊन विविध कवायती सादर करत असून घोड्यांची शिस्तबद्ध हालचाल व वेग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष बाब म्हणजे पांढऱ्या रंगाच्या घोड्यांना यंदाही अधिक मागणी दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील हौशी घोडेपालक, शेतकरी व मोठे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी माळेगावात उपस्थित आहेत. माळेगाव येथील घोडेबाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याने अनेक व्यापारी गेल्या अनेक दशकांपासून आवर्जून येथे येत आहेत.
घोडेबाजार हे केवळ व्यापाराचे केंद्र असून माळेगाव यात्रेची ओळख आणि परंपरेचा अभिमान ठरला आहे. अश्वांच्या विविध जाती, त्यांचे सौंदर्य व कौशल्य अनुभवण्यासाठी भाविकांसह अश्वप्रेमींची मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळत आहे.