नांदेड :- श्री क्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत माळेगाव याञेत आयोजित पशु, शेळी व कुक्कुट प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन आज कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मालोदे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, माजी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, सहायक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. पुरी, सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव धुळगंडे, नरेंद्र गायकवाड यांच्यासह पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी जिल्हा प्रशासनाने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ केल्याबद्दल आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. यंदा विविध गटांत तब्बल १६२३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, मागील वर्षाच्या तुलनेत पशुपालकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढल्याचे त्यांनी सांगितले.
माळेगाव यात्रा ही शेतकरी व कष्टकरी वर्गाची यात्रा असून पशुधनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पशुपालकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगत, त्याच उद्देशाने बक्षीस रकमेत वाढ करण्यात आल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता गोमातेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या ध्वजारोहणाचे मान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीणकुमार घुले यांनी केले.