मनपा सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणी व तक्रार निवारण कक्ष स्थापन, हेल्पलाईन क्रमाक जाहीर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/12/2025 7:12 PM

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगामार्फत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक – २०२५ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आलेली आहे.

निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनामार्फत “आचारसंहिता अंमलबजावणी व तक्रार निवारण कक्ष” (MCC Cell) कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

२४x७ तक्रार निवारण कक्ष

नागरिकांच्या तसेच राजकीय पक्ष व उमेदवारांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी आणि आचारसंहितेच्या पालनावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी तरुण भारत स्टेडियम, रेवणी रोड, सांगली येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्ष निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत २४ तास (२४x७) कार्यरत राहणार आहे.

संपर्क व हेल्पलाईन क्रमांक

निवडणुकीशी संबंधित किंवा आदर्श आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत आहे :

📞 हेल्पलाईन क्रमांक : ०२३३ – २९९१५००

कक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये
 • सदर कक्ष हा भरारी पथक (FST), स्थिर सर्वेक्षण पथक (SST), व्हिडिओ पाहणी पथक (VST) व व्हिडिओ पाहणी देखरेख पथक (VVT) यांच्यासाठी समन्वय केंद्र (Coordination Center) म्हणून कार्य करणार आहे.
 • कक्षामध्ये नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी व आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • निवडणूक प्रक्रियेत आर्थिक बळाचा दुरुपयोग रोखणे, जाहिरात नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदर कक्ष सतत कार्यरत राहणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, तसेच कोणत्याही तक्रारीसाठी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या